लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष लातूरकडे वेधले गेले होते. 

Updated: Apr 30, 2019, 04:54 PM IST
लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा title=

लातूर: २०१६ च्या दुष्काळात रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागलेल्या लातूरला पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात महापालिकेने आणखी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठ ऐवजी १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यापूर्वी २०१६ च्या भीषण दुष्काळात लातूरला रेल्वने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यावेळी लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण कोरडे पडले होते. यावर्षीही धरणात मृत पाणी साठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जून-जुलै महिन्यापर्यंत पुरावे यादृष्टीने १० दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय लातूर महापालिकेने घेतला आहे.  लातूरला दर महिन्याला ०५ दलघमी इतके पाणी लागते. त्यामुळे हे पाणी १० दिवसाआड वितरित करूनही जून महिन्यापर्यंत पुरेल इतके राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जून-जुलै मध्ये पाऊस न पडल्यास लातूर शहराची अवस्था आणखी बिकट होऊ शकते. 

तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष लातूरकडे वेधले गेले होते. यानंतर दोन वर्षे लातूरमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, गेल्यावर्षी पावसाने दगा दिल्याने शहरावर पुन्हा एकदा जलसंकट घोंघावू लागले आहे. या भागातील जलसाठे कोरडे पडल्याने नागरिक मिळेल तेथून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात सोमवारी औसा तालुक्यातील आलमला गावात दुर्घटना घडली होती. आलमला गावात अरुंद आडात गाळ काढण्यासाठी उतरल्यानंतर प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी गुदमरुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले होते.