Kalyan Railway Station Viral Video: मुंबई लोकल (Mumbai Local) आणि गोंधळ हे समीकरण ठरलेले आहे. अनेकदा ओव्हरहेड वायरची समस्या किंवा तांत्रिक कारणामुळं ट्रेन उशीराने धावतात किंवा वाहतूक विस्कळीत होते. याचा फटका प्रवाशांना बसतो. सकाळच्या वेळेत ऑफिसला पोहोचायला उशीर होतो आणि त्यानंतर सगळच गणित बिघडते. सोमवारी कल्याण स्थानकातही (Kalyan Railway Station) असाच काहिसा प्रकार घडला आहे. मात्र, यावेळी रेल्वेची नव्हेतर एका माथेफिरु व्यक्तीमुळं लोकल रुळांवरच थांबून राहिली होती.
कल्याण स्थानकातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. य व्हिडिओत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वे ट्रॅकवर एक तरुण बसून राहिला होता. याचवेळी कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला एक लोकल रवाना होत होती. सुदैवाने मोटरमनला रेल्वे रुळांवर एक तरुण बसलेला दिसला. त्याने तत्परता दाखवत ट्रेन लगेच थांबवली.
तरुणाला रेल्वे रुळांवरुन बाजूला काढण्यासाठी मोटरमन रेल्वेतून खाली उतरला. मात्र, तरुण रुळांवरुन बाजूला होण्यास तयारच नव्हता. मोटरमनने रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या तरुणाला कोण आहेस आणि इथे का बसलायस? असे विचारल्यावर त्याने ये मेरा एरिया है, मै यहा रहता हू, मै कही भी बैठ सकता हू, (मी इथे राहतो आणि हा माझा एरिया आहे. मी कुठेही बसू शकतो, असं उत्तर दिलं.
तरुण नशेत असून तो रेल्वे ट्रॅकवर बसला होता. मोटारमनच्या अनेक प्रयत्नानंतर त्याला तिथून बाजूला करण्यात यश आले. तसंच, त्यानंतर स्टेशन परिसरात राहणाऱ्या लोकांना त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास मोटरमनने सांगितले. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी लोकल रवाना झाली. लोकलने वेग पकडण्याआधीच मोटरमनला रेल्वे ट्रॅकवर तरुण बसलेला दिसला. तेव्हा त्यांनी पुढचा धोका ओळखून तात्काळ ट्रेन थांबवली व लोकलमधून खाली उतरवत त्याला तिथून बाजूला नेले. मोटरमनने प्रसंगावधान राखत त्या तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसंच, सोशल मीडियावर या मोटरमनचे कौतुकही करण्यात आले.