Maratha Aarakshan Manoj Jarange: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावामध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसत आहेत. मात्र त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी आरक्षण का दिलं जात नाही हे समजत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारला पंतप्रधान मोदी का निर्देश देत नाही हे समजत नसल्याचं विधानही मनोज जरांगेंनी केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण देणार असं म्हटल्याचा संदर्भ देत जरांगेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "आम्ही मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. केवळ बोलत नाही खरोखरच आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही हे आम्हाला आज दिवसभरात शोधावं लागेल की काय किंवा आमच्या अशाच पिढ्या हे शोधण्यामध्ये जाणार काही कळत नाही," असं मनोज जरांगेंनी म्हटलं. "त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो, कौतुक करतो आणि आदरही करतो. मात्र आमच्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता येणार नाही," असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
आरक्षण कसं दिलं जात नाही असा प्रश्नही मनोज जरांगेंनी विचारला. "बाकीच्यांना कशातून आरक्षण दिलं? मराठ्यांनी सगळे निकष पार केले आहेत. आरक्षण शक्य नाही असं म्हणता तर इतरांना कशाच्या आधारावर दिलं आहे. नेमकं आम्हाला आरक्षण नाकारण्याचं कारण काय सांगा. तुम्ही 30 दिवसांचा वेळ मागितला आम्ही 40 दिवस दिले. आज 41 वा दिवस आहे," असं जरांगे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंनी भाजपावर आरक्षणासाठी विश्वास ठेऊ नये असं म्हटल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मनोज जरांगेंनी, "तो त्यांचा राजकीय विधान आहे. आम्ही त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. मुख्यमंत्रीसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्लही आदर आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना आम्हाला कोण आरक्षण देऊ देत नाही? कारण काय आरक्षण न देण्याचं?" असा प्रतिप्रश्न विचारला. "सरकार निरुत्साही दिसतंय असं म्हणावं लागेल. कारण 30 दिवस दिले त्यानंतर आज 41 वा दिवस आहे. आम्हाला आमची लेकरंबाळं महत्त्वाची आहे. आरक्षण कसं मिळत नाही ते आपण बघू. आजपासून मी उपोषणाला बसतोय," असंही मनोज जरांगे म्हणाले.
नक्की वाचा >> मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी...
मराठा समाजाने अनेक नेत्यांना गावंबदी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आम्ही रद्द करु असं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आम्ही जगाला दाखवून देऊ मराठ्यांची ताकद काय आहे ते दाखवण्याचं आवाहन केलं जात आहे. मराठे आक्रमक होत आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मनोज जरांगेंनी, त्यांनी आमच्या दारात देऊ नये एवढाच गावबंदीचा अर्थ आहे, असं उत्तर दिलं. "मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने मार्ग काढला पाहिजे. सरकारी समितीने एकदाही आमच्याशी संपर्क साधला नाही. जालन्यातील विभागिय आयुक्तांनी बोलवलं होतं तेव्हा आमचे लोक गेले होते," अशी माहितीही मनोज जरांगेंनी दिली.
"मुख्यमंत्र्यांना कोणीतरी आडवतंय. 100 टक्के खरं दिसतंय. आम्ही मोदी साहेबांना विनंती केली होती. त्यांना गोरगरिबांची जाण आहे. आम्ही त्यांना हाक दिलेली की राज्य सरकारला सांगा गोरगरीबांच्या लेकरांना हक्क द्या. त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं नाही म्हणजे गांभीर्य नाही," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना बोललं पाहिजे, असं तुम्ही यापूर्वी म्हणाला आहात. उद्या पंतप्रधान शिर्डीमध्ये आहेत याबद्दल काय सांगाल असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. "मोदीसाहेबांना आम्ही विनंती केली की साहेब हा विषय गंभीर आहे. समाजाची संख्याही खूप आहे. एवढ्या मोठ्या समाजाची तुम्ही दखल घेणार नसाल तर पूर्वी जे आम्हाला वाटत होतं की गोरगरीबांची दखल घेता याबद्दल कुठं तरी बारीकपणा वाटू लागला आहे. आतापर्यंत सरकारला कोणतीच सूचना नाही. त्यामुळे ते गोरगरीबांचं ऐकतात का याची थोडी शंका यायला लागली," असं मनोज जरांगे म्हणाले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून आरक्षणावर चर्चा केली पाहिजे का? असा प्रश्न मनोज जरांगेंना विचारण्यात आला. यावर मनोज जरांगेंनी मोदींच्या एका फोनने काम होईल असं म्हटलं आहे. "आहो, पंतप्रधानांना भेटायची गरजच काय एक फोन लावला तर संध्याकाळपर्यंत आरक्षण भेटेल. त्यांनी फक्त एक फोन करुन सांगितलं पाहिजे की आरक्षण देऊन टाका. की बुंगाट पळतील अंतरवाली सराटीकडे. शपथ घेऊन सांगतो. मोदीसाहेबांचा केवळ फोन येऊ द्या या तिघांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 4 वाजता कागद आला नाही तर बघा. मराठ्यांना आरक्षण जाहीर थेट ब्रेकिंग न्यूज येईल. पण त्यांना टाईम नाही का काय कळत नाही गोरगरीबांवर लक्ष द्यायला," असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलं.