मुंबई :मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसळ वळणाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी परिपत्रकाद्वारे शांततेचं आवाहनं केलंय. आंदोलकांनी हिंसा, जाळपोळ टाळायला हवी तसेच औद्योगिक क्षेत्राला झळ पोहोचू देऊ नये असेही त्यांनी म्हटले. मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे तसेच काही लोकं आंदोलन बदनाम करत आहेत असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही परंतू कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे. त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे, आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत.
राज्यकर्ते व हितसंबधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे.
एखादे आंदोलन सुरु केल्यानंतर कोठे थांबावे याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन.
आरक्षणाच्या अमंलबजावणी संदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन आणि विधीमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी.