औरंगाबाद: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलीय. बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहिल आणि बसवर कुणीही दगडफेक करु नये असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रवींद्र पाटील यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. जोवर ही कारवाई होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिकाही आंदोलकांनी घेतलीय.
आषाढी वारीला पांडुरंगाच्या पायावर माथा टेकवण्यासाठी दाखल झालेले वारकरी आज पंढरपुरातून आपापल्या गावाकडे परतत आहेत. वारकऱ्यांमध्ये एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे या बंदचा एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यात आहे. काही प्रमाणात एसटी वाहतुकीवर बंदचा परिणाम जाणवतोयही. दरम्यान, पुणे रस्त्यावर सध्या वाहतूक सुरू आहे. राज्यातल्या इतर मार्गांवर परिस्थिती पाहून एसटी सुरू राहील.
मराठा समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घातपाती ठरवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय. मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीय.