औरंगाबाद: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीत उडी घेतल्याने मृत्यू पावलेल्या काकासाहेब शिंदे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यावर काकासाहेबांच्या मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, काकासाहेबांच्या कुटुंबियांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबियांच्या काही मागण्या मान्य केल्या.
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच, त्यांच्या भावालाही सरकारी नोकरीत घेतले जाणार आहे.
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोक्यावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी मारली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केली. तसेच आंदोलकांनी पुणे-औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.