Marahta Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात फिरकू दिलं जाणार नाही असा इशाराही मराठा समाजाने दिलाय. याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात (Madha) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. भाषणादरम्यान मराठा आंदोलकांना एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून सभेतून बाहेर नेलं.
शरद पवारांचा दौरा रद्द
दरम्यान, मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी (Sharad Pawar) सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. मात्र अचानक त्यांनी हा दौरा केला होता. इंडिया आघाडीच्या बैठकीचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. मात्र शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती असा इशारा मराठा आंदोलकांनी (Maratha Andolan) दिला.. तसंच शरद पवारांच्या आजच्या दौ-याचा बोध घेत सरकारने बोध घ्यावा असा सल्लाही मराठा आंदोलकांनी दिलाय.
मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
आम्हाला कुणबी म्हणून मलमपट्टी नको तर मराठा म्हणूनच आरक्षण मिळायला हवं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं (Maratha Kranti Morcha) केलीय. मराठा क्रांती मोर्चाचे सुनिल नागणे आणि प्रतापसिंह पाटिल यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण (Reservation) द्यावं अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चानं घेतलीय.
नेत्यांना गावबंदी
गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव करण्यात आलाय. चक्क ग्रामसभा घेत ठराव संमत करत पुढा-यांना गावबंदी करण्यात आलीय. नेत्यांच्या गावबंदीचे फलक गावच्या वेशीवर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झळकलेत. अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने नेत्यांची चांगलीच कोंडी झालीय. नेत्यांना गावात पाऊल ठेवणं मुश्किल झालंय. चुलीत गेले नेते अने पक्ष, मराठा आरक्षण एकचं आमचं लक्ष्य.. अशा पद्धतीचे फलक गावोगावी लागताना दिसलेत. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भारती पवार यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. आता तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढा-यांना गावबंदी करण्यात आलीय. त्यामुळे निवडणुका उंबरठ्यावर असताना पुढा-यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळतेय..