जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : जातीत तेढ नर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 21, 2023, 01:50 PM IST
जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल title=

Maratha Reservation : जातीजातींमध्ये तेढ निर्माण करुन सरकारलाच दंगली भडकवायच्या आहेत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil_ यांनी सरकारला केलाय. तर मराठा आंदोलकांवर असेच गुन्हे दाखल होत राहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात रोष वाढत राहील, असा इशाराही जरांगेंनी ठाण्याच्या सभेत दिला. मनोज जरांगेंची आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. सभेआधी ठाण्यात (Thane) जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  मनोज जरांगे-पाटील आज मुख्यमंत्री शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बालेकिल्ल्यात आहेत...ठाण्यात बाईक रॅली काढून जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय...ठाण्यात माजीवाडा इथे 10 ते 12 जेसीबीमधून फुलांची उधळण करून जरांगेंचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारेही (MP Rajan Vichere) उपस्थित होते.

ठाण्याच्या सभेसाठी कल्याणहून रवाना होण्याआधी जरांगेंनी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलं. काल जरांगेंची कल्याणमध्ये सभा झाली त्यानंतर ते कल्याणमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, ठण्यानंतर पालघरमधल्या बोईसरच्या सर्कस ग्राउंडवर मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे. याठिकाणी 40 टक्के जागा सभेसाठी आणि उर्वरित 60 टक्के जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आलीय. या सभेसाठी 5 हजारांहून अधिक मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीये. सभेनंतर जरांगेंचा आजचा मुक्काम हा त्रंबकेश्वरला आहे

जरांगे यांची टीका
मराठ्यांवर लाठीचार्ज केल्याचं बक्षीस जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना भेटलं असेल, अशी टीका मनोज जरांगे यांनी केलीये. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावं अशी मागणी करणार असल्याचं जरांगे म्हणालेत. कल्याणच्या पोटे मैदानात मनोज जरांगे यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते...

छगन भुजबळांना धमकी
मनोज जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने रोज धमक्या येत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिलीय. रोज 250 पेक्षा जास्त कॉल, मेसेज, व्हॉट्सअॅपवरून धमक्या येत असल्याची तक्रार करण्यात आलीय. आरक्षणावरून सध्या भुजबळ आणि जरांगे असं वाकयुद्ध सुरू असून रोजच एकमेकांवर टीका केली जातेय. यामुळेच धमक्या आल्याची तक्रार करण्यात आलीय. तसंच मी एकटा पडलो नाही, ओबीसी समाज माझ्या पाठिशी आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर दिलीय. माझ्या स्टेजवर येणार नसाल तर नका येऊ मात्र, ओबीसी बचाव आंदोलन सुरू ठेवा, असं आवाहनही भुजबळांनी केलंय. भुजबळांना कुणीतरी स्क्रिप्ट लिहून देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर  उत्तर देताना माझी स्क्रिप्ट ही छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांची असल्याचा टोला भुजबळांनी लगावलाय...