Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर वैद्यकीय पथक उपोषण स्थळी दाखल झाले आहे.मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सलाईन लावली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर तात्काळ वैद्यकीय टिमने त्यांची तपासणी सुरु केली. मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले जालन्यातले मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.
आंदोलनकर्ते आणि मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तुम्हाला यावेळी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू, असं मंत्री संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले. त्यावर जरांगे यांनी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरू द्या, असे उच्चार काढले. मी असाच मेलेला बरा. नाहीच मिळालं आरक्षण तर मी उपोषण करताना मेलेला बरा. कारण आज मी समाजाला शब्द दिलाय, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यावेळी नाही झालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल, असं मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय. जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, जालनानंतर आता अहमदनगर कोपर्डी गावात सकल मराठा समाजानं उपोषण सुरू केलंय. कोपर्डीतील भैरवनाथ मंदिरात उपोषणाला सुरुवात झालीय. .मराठा समाजाला आरक्षण मिळावं. कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी. कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केलीय.