सोलापूर: मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सोलापूर पालिकेची परिवहन सेवा , एसटी सेवा , रिक्षा, बाजारपेठा, शाळा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतले सर्व व्यवहार बंद आहेत. मराठा संघटनांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकातून नवी पेठेपर्यंत मोर्चा काढला. शहरातली बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी फलटणमध्ये मुंडण आंदोलन करण्यात आलं. गेल्या चार दिवसापासून फलटणच्या तहसीदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलन तीव्र करत शेकडो आंदोलकांनी सामूहिक मुंडण केलं आणि शासनाचं श्राद्ध घातलं. लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाचा मागणीसाठी आज (सोमवार,३० जुलै) नंदुरबार शहरासह तालुका बंद ठेवण्यात आला आहे. सकाळ पासून मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते बंदचे आहवान करीत होते. बंदच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार आगराची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बस सेवा बंद राहणार असून बाहेरगावी जाणार्या प्रवाश्याना या बंदमुळे गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.