जालना : ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास महादेव जानकर यांनी विरोध केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्यांना एस इबीसी मधून आरक्षण द्यावं, अशी मागणी जानकरांनी जालन्यात केलीय. तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही विरोध दर्शवलाय. ओबीसींची जनगणना तातडीनं करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
हा लढा ओबीसींच्या अस्तित्वाचा आहे आणि जर याला शक्ती प्रदर्शन म्हणाल तरी मान्य असे सांगत ओबीसी रस्त्यावर उतरणारच अशी भूमिका राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलीये.
काही लोक आमच्या आरक्षणावर लक्ष ठेवून आहे. बोगस गायकवाड अहवालचे दाखले देण्यात येतायत मात्र तो अहवाल मान्य नाही आणि आमचे आरक्षण सुद्धा विभागू देणार नाही. सोबत ओबीसींची जनगणना सुद्धा तातडीने व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत.
जालना शहरात आज व्ही जे एन टी, एन टी, एस बी सी आणि ओबीसी समाजातर्फे भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ओबीसींची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. जनगणना झाल्यास ओबीसींसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करता येणार आहे. त्यामुळे हा मोर्चा ओबीसी मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरेल असा विश्वास समन्वय समितीनं व्यक्त केलाय.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंमादेवी मंदिर चौक, गांधी चमन चौक, शनिमंदिर मार्गे, अंबड चौफुली असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, संजय राठोड, हंसराज अहिर, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राजीव सातव, समीर भुजबळ, महादेव जानकर हे देखील या महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. अंबड चौफुली भागात हा मोर्चा पोहोचल्यावर तिथे सभा घेतली जाणार आहे.
दरम्यान ओबीसी मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली होती. आता परवानगी मिळाल्याने सर्वपक्षीय ओबीसी नेते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही 2021ची जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे अशी मागणी केलीये. तशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.