Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शीत उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महिला उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील कार्यकर्तेदेखील उपोषण करत आहेत. बार्शी तालुक्यातील रासुरेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यात वैशाली आवारे यांची तब्येत खूपच खालावली आहे. उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांना सलाईन लावण्यात आली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. येथे उपोषणकर्त्यांचा अन्नत्याग सुरू असून, जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सोलापुरात मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाने निदर्शन करत ठिय्या आंदोलन केलं...सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विजयकुमार देशमुखांनी मराठा समाजाचं निवेदन स्वीकारलं.
दुसरीकडे मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. तसच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. लाठीचार्जप्रकरणी तीन अधिका-यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय. तर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र सरकारला आणखी वेळ कशासाठी हवा आहे असाही सवाल त्यांनी केलाय. आपण दोन पावलं मागे येऊ मात्र ठोस निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय.
जरांगेंच्या उपोषणापूर्वी सर्वपक्षीय बैठक का घेतली नाही असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र कायद्यात बसत असेल तरच द्या आणि शक्य नसेल तर तसं स्पष्ट सांगा असा सल्ला संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलाय.
फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कृती करावी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी दिलाय.. लवकरात लवकर संसदेत बिल आणून आरक्षण सीमा वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर प्रश्न सुटू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.