कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. अनेक संसार उद्धव्स्त झाले. पूरग्रस्त भागाचे राजकीय नेत्यांकडून पाहणी दौरेही सुरु आहेत.
मराठमोठी अभिनेत्री दिपाली सय्यदही पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशा नुकसानग्रस्त लोकांना दिपाली सय्यदने मदतीचा हात दिला आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर, रत्नागिरी रायगड पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या घरबांधणीसाठी दहा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
आज दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी परिसरात पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या घरी भेट देऊन पडझडीची पाहणी केली. पुरात झालेल्या नुकसानीची माहिती देखील त्यांनी घेतली. यावेळी डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा सांगणाऱ्या महिलांना त्यांनी आधार दिला. नुकसानग्रस्तांना ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल देखील त्यांनी यावेळी आश्वस्त केलं.