दुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार; काय म्हटलंय नव्या विधेयकात?

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना’ अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. याला चाप लावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागहांत मंजूर करण्यात आले.

Updated: Mar 9, 2022, 09:42 PM IST
दुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार; काय म्हटलंय नव्या विधेयकात? title=

मुंबई : ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना’ अधिनियम २०१७ मध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. याआधी दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकान नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. ही पळवाट काढून टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर याविषयीचे विधेयक विधीमंडळात मांडण्यात आले.

विधिमंडळात हे विधेयक मांडून त्यावर मंजुरीची मोहोर उमटविण्यात आली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. दुकान किंवा आस्थापना छोटी असो वा मोठे त्यावर मराठी पाटी लावायलाच हवी अशी सुधारणा या विधेयकात करण्यात आली आहे.
 
मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसर्‍या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती या विधेयकात करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या झळकतील असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. 

राज्यातील मद्यविक्री आणि मद्यपान सेवा पुरविणाऱ्यांची दुकानांची नावे महापुरुषांच्या नावावर असल्याचे दिसून येतात. तर, अनेकांनी गड किल्ल्यांची नावे दुकानांना दिली आहेत. मद्यविक्री व मद्यपान सेवा पुरविणाऱ्या सर्व दुकानांवर महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे असू नये, असेही या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे नवी सुधारणा 
- दुकानांच्या नामफलकावर सुरुवातीला मराठी अक्षरातच दुकानाचे नाव लिहिले असावे
- मराठी अक्षराचा आकार हा अन्य कोणत्याही भाषेच्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
- नामफलकावर सुरुवातीला मराठी मोठ्या अक्षरात असेल तर त्या शेजारी अन्य कोणत्याही भाषेत नाव लिहिण्यास मनाई करण्यात आलेली नाही