संग्राम पाटील यांना राजौरीत हौतात्म्य, निगवे खालसा गावावर दु:खाचा डोंगर

पाकिस्तानच्या भ्याड (Pakistan attack) हल्ल्यात  संग्राम पाटील (Sangram Patil) यांना जम्मू-काश्मीरमधील राजौरी (Rajouri) इथे हौतात्म्य (Heroic death) आले.  

Updated: Nov 21, 2020, 04:37 PM IST
संग्राम पाटील यांना राजौरीत हौतात्म्य, निगवे खालसा गावावर दु:खाचा डोंगर

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड (Pakistan attack) हल्ल्यात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील निगवे खालसा गावचे संग्राम पाटील (Sangram Patil) यांना जम्मू-काश्मीरमधील राजौरी (Rajouri) इथे हौतात्म्य (Heroic death) आले. संग्राम पाटील हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरात ही दुसरी दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. 

काही दिवसांपूर्वीच बहिरेवाडीच्या ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तानच्या गोळीबारात वीरमरण आले होते. आता त्यानंतर अवघ्या आठवडाभरात जिल्ह्यातील संग्राम पाटील या शूर सैनिकाने आपला देह काश्मिरात शत्रूशी लढताना धारातीर्थी ठेवला. संग्राम पाटील यांच्या निधनाचे वक्तव्य ऐकून निगवे खालसा या गावात प्रचंड शोककळा पसरली आहे. 

पाकिस्तानला आता जशास तसे उत्तर दिले पाहिजे. केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेवून हल्ला चढवला पाहिजे. तरच पाकिस्तानला धडा मिळेल. आमच्या गावातील आज संग्राम गेला आहे. मात्र, आणखी १०० संग्राम तयार होतील. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. गरीबीतून त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्धार केला. देशाची सेवा बजावली. याचा आम्हाला गावकरी म्हणून अभिमान आहे. आमच्या गावातून यापुढेही तरुण सैन्यात दाखल होतील, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. 

तसेच संग्राम हे मनमिळावू होते. अलिकडेच ते गावात आले होते. त्यावेळी त्यांनी गावातील तरुणांना व्यायामाबाबत मार्गदर्शन केले. गरीबीवर मात करुन खडतर परिश्रम करुन सैन्यात दाखल झालेत, अशा त्यांच्या आठवणी यावेळी ग्रामस्थांनी जागवल्या.