लोणावळ्याला जायला निघताय, हे नक्की वाचा

काही दिवसांपासून या भागात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं.... 

Updated: Oct 14, 2020, 10:20 AM IST
लोणावळ्याला जायला निघताय, हे नक्की वाचा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागील बऱ्याच दिवसांपासून ऐन पावसाळी ऋतूच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि मावळमध्ये पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत होतं. ज्यानंतर आता या भागांतील पर्यटन बंदी उठवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही पर्यटन बंदी रद्द करत सर्व ठिकाणं पर्यटनासाठी खुली केली आहेत. 

मावळ हा तालुका बहुतांशी पर्यटकांच्या दृष्टीनं आकर्षणाचा विषय. अनेक गड किल्ले आणि लेण्या या परिसरात असल्याचं पाहायला मिळतं. त्याशिवाय येथील धरणांचे परिसरही पर्यटकांना आकर्षित करतात. लोणावळ्यातही फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातूनही पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतो. 

सदर भागांकडे असणारा पर्यटकांचा ओघ पाहता अखेर कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर  या भागात असणारी पर्यटन बंदी अखेर उठवण्यात आली आहे. ज्यामुळं पर्यटनावर आधारित व्यावसायिक आणि लहानमोठी दुकानं चालवून उदरनिर्वाह करणाऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे पर्यटन बंदी उठवण्यात आली असली तरीही या ठिकाणी शासकीय निर्बंधांचं पालन करणं मात्र बंधनकारक असणार आहे.

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्याव वाढू लागल्याचं दिसताच अनेक ठिकाणी पर्यटन बंदीचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते.  ज्यानंतर बहुतांश ठिकाणी पर्यटनावर आधारित व्यवसाय ठप्प झाले होते. परिणामी अनेकांच्या रोजगारासंबंधी प्रश्नही निर्माण झाला होता. ही बंदी उठल्यामुळं आता या परिसरात पर्यटकांची गर्दी होणार असली तरीही कोरोनाबाबतची सावधगिरी पाळली गेलीच पाहिजे यासाठी प्रशासन आग्रही आहे.