धक्कादायक! MBBS च्या दुसऱ्या वर्षाचा पेपर फुटला

एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये एक मोठा घोळ झाला आहे. 

Updated: Mar 14, 2022, 11:56 AM IST
धक्कादायक! MBBS च्या दुसऱ्या वर्षाचा पेपर फुटला title=

लातूर : नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मेडिकल अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरु आहेत. दरम्यान यावेळी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये एक मोठा घोळ झाला आहे. यामध्ये नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेली सरीव परीक्षेचा पेपर जशाचा तसा अंतिम परीक्षेसाठी आल्याचं समोर आलं. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडलाय. शुक्रवारी एमबीबीएस दुसऱ्या वर्षाचा मायक्रोबायोलॉजीचा हा पेपर होता. हा पेपर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सराव परीक्षेसाठी दिलेल्या पेपरपैकीच होता. यामुळे 4 महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटला असल्याचं सिद्ध झालं आहे. 

दरम्यान आता आरोग्य विद्यापीठाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना हा पेपर पुन्हा एकदा द्यावा लागणार आहे. मायक्रोबायोलॉजीचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे. 

संबंधित विषयाच्या प्राध्यापकाने पेपर सेटिंग करून विद्यापीठाला तीन संच दिले होते. त्यातील एक पेपर सराव परीक्षेसाठी वापरला. योगायोगाने तोच पेपर विद्यापीठात परीक्षेत आल्याने गोंधळ उडाला. प्राध्यापकाने सराव परीक्षेचं काम वाचवण्यासाठीच विद्यापीठाला दिलेल्या संचातला एक पेपर देऊन टाकला. तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.