मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हत्येचे गुढ उलगडले, एकाला अटक

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या हत्येचं गुढ अखेर उलगडलेय.  

Updated: Dec 18, 2018, 04:23 PM IST
मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हत्येचे गुढ उलगडले, एकाला अटक title=

औरंगाबाद : मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या हत्येचं गुढ अखेर उलगडलेय. वसतिगृह शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरील मजुरानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. त्यामुळे सात दिवसांत गुढ उलगडण्यास मदत झालेय. या हत्येचे धागेदोरे सापड नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

राहुल शर्मा याने आकांक्षाच्या स्वप्नांचा चुराडा केलाय. आकांक्षाला डॉक्टर बनत आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. पैशाच्या हव्यासापोटी ११ डिसेंबरला हा आरोपी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मुलींच्या वसतिगृहाच्या छतावर आला. तिथेच तो लपून बसला. मध्यरात्री छतावरून खाली आला आणि आकांक्षाच्या खोलीत शिरला. तिथं त्याची आकांक्षासोबत झटापटही झाली. त्याने आकांक्षाच्या गळ्यातली सोन्याची साखळी खेचली आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. आकांक्षाना या सगळ्याला विरोध केला. त्यावेळी या नराधमाने तिचा गळा आवळला आणि त्यातच आकांक्षाचा मृत्यू झाला, अशी माहिती औरंगाबाद पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी माहिती दिली.

घटनेनंतर नराधम उत्तर प्रदेशातल्या गावात पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केलीय. परराज्यातून अनेक मजूर कामासाठी महाराष्ट्रात येतात. मात्र त्यांचा ठावठिकाणी कुणालीही माहित नसतो. गुन्हे करून ते फरारही होतात. मात्र यापुढे अशा सगळ्या परप्रांतीय व्यक्तींवर नजर ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

आकांक्षाचा खुनी सापडला आणि तिच्या हत्येचे गूढ उलगडलंय. मात्र नराधमाच्या पैशाच्या हव्यासामुळे कोवळ्या वयाच्या आकांक्षाला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.