Central Railway Mega Block : रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धाणार नाही. तर, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावतील. यामुळे प्रवाशांना वेळेचे नियोजन करुनच घराबाहेर पडावे लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशीराने पोहचतील.
सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशीराने पोहचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ट्रेन ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्या अप मेल/एक्स्प्रेस ट्रेन कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.