Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत MD ड्रग्ज बनवणा-या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 106 कोटी 50 लाखांचं MD ड्रग्ज जप्त केलं असून मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक केलीये. इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली MD ड्रग्जचा कारखाना होता. 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह 107 कोटी रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावच्या हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्वरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन हा ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. प्रत्यक्षात मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात होते. खोपोली पोलीसांना या कारखान्याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती. यानंतर या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.
पोलीस पथकाने या कारखान्यावर धाड टाकली. कंपनीच्या चालकाकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शामनाचा कोणताही वैध परवाना सापडला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत होता. येथे काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली. याबाबत तयार पक्का माल असलेली पावडर ही नाकों इन्स्पेक्शन कोट (Narco Inspection kit) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेडॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.
या मुद्देमालाची एकुण किंमत जवळपास 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपयांचा मुद्देमाल मालमत्ता जप्त करुन सील करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली आहे.
रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रग्जची पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली होती. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये 62 किलोंचा चरस साठा जप्त करण्यात आला होता. या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 कोटी होती. यापूर्वी 20-21 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर अशाच पद्धतीनं जागोजागी ड्रग्सची पाकिटं सापडत होती. दापोली तालुक्यातल्या कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बो-या समुद्रकिना-यावरून पोलिसांनी ड्रग्सची पाकिटं जप्त केली होती. दापोलीतून कस्टम विभागानं तब्बल 222 किलो चरस जप्त केले होते. विशेष म्हणजे श्रीवर्धन आणि दापोली दोन्ही ठिकाणी सापडेल्या पाकिटांवर जो मजकूर छापलाय त्यावरुन अफगाणिस्तानातून हा माल आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.