घरून निघालेला कामगार परतलाच नाही, पाहा कंपनीमध्ये नेमकं काय घडलं?

घरातून निघाला कंपनीत कामही सुरू झालं... पण काम संपवून तो घरी परतलाच नाही... पाहा नेमकं काय घडलं

Updated: Feb 13, 2022, 04:58 PM IST
घरून निघालेला कामगार परतलाच नाही, पाहा कंपनीमध्ये नेमकं काय घडलं? title=

वर्धा : घरातून कंपनीमध्ये कामाला गेलेला माणूस घरी परतला नाही तर जीवाची घालमेल होते. कुटुंबातील मंडळी बेचैन होतात. कामाला गेलेला कामगार घरी परतलाच नाही. ही घटना वर्ध्यामधील उत्तम गालवा कंपनीत घडली आहे. ही कंपनी  एमएनडी या भागात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कन्वर्ट बेल्टमध्ये अडकून ऑपरेटरचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज पहाटे 5 वाजता घडली. या घटनेमुळे भुगावच्या उत्तम गालवा येथील स्टील कंपनीतील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये संताप असून सेफ्टी उपकरणे आणि इथे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड  याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

 या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव कमलेश गजभिये असून तो भंडारा येथील राहणारा आहे. तो मागच्या 10 वर्षापासून उत्तम गालवा  कंपनी भुगाव येथे ऑपरेटर या पदावर  काम करत होता. 

नेहमीप्रमाणे तो मिक्सिंग अँड नेड्यूलायझिंग ड्रम विभागात रात्रपाळीची ड्युटी करत होता. अचानक मशीनमध्ये अडकून दुर्घटना घडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. बऱ्याच वेळेनंतर ही घटना तेथील हेल्परच्या लक्षात आली. 

हेल्परने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित विभागातील सर्व कर्मचारी येऊन  मशीन बंद केली. त्यानंतर कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी सेवाग्राम रुग्णालयात आणण्यात आलं आहे. 

हा सर्व प्रकार होऊनही कंपनीच्या संचालक मंडळातर्फे विचारपूस करण्यात आली नाही असं उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी सर्व कर्मचारी वर्गांनी केली आहे.