अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी हवामान विभागाने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. मुंबईतील विशेषतः पावसाळ्यातील हवामानातील प्रत्येक बदलासाठी हवामान विभागाने तयारी सुरु केल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हवामान विभागाची मुंबईत आता 100 पर्जन्यमापन केंद्र आणण्याचा प्लान केला असून यामुळे मुंबईच्या कोणत्याही भागातील पावसाची आकडेवारी दर 15 मिनीटांनी मिळणार आहे. मुंबईच्या दिमतीला आणखी चार डॉप्लर रडार येणार असून यामुळे मुसळधार पाऊस, ढगफुटीसारख्या घटनांचा अचुक अंदाज मिळणार आहे.
हवामान विभागाकडे याआधी दोन पर्जनमापन केंद्र होती. सांताक्रुझ आणि कुलाबा इथून पर्जनमापन केले जाते. आता 100 पर्यज्यमापन केंद्रांची तयारी हवामान विभागाने पुर्ण केली आहे. यापुढे आता मुंबईच्या कोणत्याही भागातील 15 मिनीटे आधीपर्यंत एकुण किती पाऊस झाला याची अपडेट माहिती मिळणार आहे.
एवढंच नाही मुंबईच्या दिमतीला आणखी चार डॉप्लर रडारची उभारणी पुढील वर्षात केली जाणार आहे. यामुळे मुसळधार पावसाचा विशेषत ढगफुटीसारख्या घटनांचा अचुक अंदाज सांगता येणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.