पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांचा जामीन पुणे सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष असलेल्या एकबोटेंसाठी हा मोठा दिलासा आहे. मिलिंद एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिला गुन्हा अॅट्रोसिटी तसंच दंगल घडवण्याबाबतचा आहे. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला दुसरा गुन्हा हिंसाचार आणि जाळपोळीचा आहे.
यापैकी पहिल्या गुन्ह्यात आधीच जामीन मंजूर झालेला होता. मात्र शिक्रापूर पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यामध्ये देखील जामीन मिळावा यासाठी मिलिंद एकबोटे यांनी अर्ज केला होता. तो आज पुणे सत्र न्यायालयानं मंजूर केला. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिले आहेत.