पुणे: शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात काल (शनिवार,१४ जुलै) संध्याकाळी आयोजित राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी कमी झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला आणखी एक रुपया वाढवून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. या दरवाढीचा ग्राहकांवर काहीही परीणाम होणार नाही. सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे. त्या पार्श्वभूमीवर तातडीनं ही बैठक बोलावली गेली होती.
दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. आम्ही कायदा हातात घेणार आहोत, सरकारने काय करायचे आहे ते करावे, असा इशारा शेट्टींनी सरकारला आगोदरच दिला आहे दिलाय. दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, कर्नाटक-केरळ-गोव्याप्रमाणे दूधाला राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी शेट्टींनी केलीय. सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास १६ जुलैपासून एक थेंब दूध विकले जाणार नाही असा इशाराही शेट्टींनी दिला होता. दरम्यान, शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तरीही राजू शेट्टी आंदोलनावर ठाम असल्याची माहिती आहे.
दूध संघ चालवणारे आणि खासगी प्रक्रिया उद्योगांचे दूध व्यवसायातील अधिकारी, तसंच सरकार आणि अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत. या लागेबांध्यांमुळेच लूट करायला सरकार सूट देत असल्याचा आरोप, किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याची टीकाही नवलेंनी केली. १६ जुलैपासून सुरु होत असलेल्या दूध आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनंही पाठिंबा दिलाय.