bacchu kadu latest news : जळगाव : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादात शिंदे गटाच्या 40 आमदारांना बदनाम करु नका, असे खडे बोल मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आमदार रवी राणा यांना सुनावले आहेत. त्यांना समज देण्यात यावी, असेही त्यांनी म्हटलेय. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केला होता. तेव्हा रवी राणा यांनी शब्द मागे घेण्याचे आवाहनही गुलाबराव पाटील यांनी केले आहे. शिंदे गटातले कोणी विकाऊ नाहीत, त्यामुळे रवी राणांना आवर घाला अशी मागणीही गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
आमदार रवी राणा ( Ravi Rana) आणि बच्चू कडूंमधला (Bachchu kadu) वाद आता टोकाला पोहोचलाय. बच्चू कडू यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिले आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू, असा थेट निर्वाणीचा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे अन्यथा आपण मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे रवी राणा यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी बच्चू कडू यांनी थेट उत्तर दिले आहे. आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. त्यांनी मला बोलावले तर मी जरुर जाईल, असे राणा यांनी सांगत बच्चू कडू यांना डिवचलं आहे.
बच्चू कडू यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये (Nagpur Press Club) पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी रवी राणा यांच्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर, आपण मोठा धमाका करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. त्याचवेळी राणा यांना बदनामी केल्याप्रकरणी कोर्टात खेचणार असल्याचे संकेत दिलेत.