खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा; नागपुरातील घटना

Nagpur News Today: नागपुरच्या समता नगर परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी खोदकामात देवीचा मुखवटासमोर आल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2023, 03:25 PM IST
खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा; नागपुरातील घटना title=
miracle in Nagpur as Jagdamba devi murti found in the ground

पराग ढोबळे, झी मीडिया

Nagpur News: नागपूरमधील समता नगर परिसरात मंगळवारी खोदकाम करत असताना देवीचा मुखवटा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. देवीचा मुखावटा सापडल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारपासून एकच गर्दी केली आहे. हजारो भाविक दर्शनासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीतून खोदकामादरम्यान देवीचा मुखवटा निघाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. देवीचा हा मुखवटा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पूजाअर्चा करताना दिसून येत आहेत. घटनास्थळी सध्या पुरातत्व विभागाकडून कोणीही पोहोचलेले नाहीये, हा मुखवटा किती पुरातन आहे याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र, नागरिकांकडून जिथे मुखवटा सापडला आहे त्या जागेवर मंदिर बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. 

नागपूरातील समता नगर भागात असलेल्या रिकाम्या जागेत खोदकाम सुरू असताना देवीचा मुखवटा आढळून आला आहे. दगडाचा हा मुखवटा समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय. मंगळवारपासून स्थानिक नागरिकांनी पूजेसाठी गर्दी केली आहे. नागपूर शहरातून मोठ्या प्रमाणातून लोक येत आहेत. नागरिक ही जगदंबेची मूर्ती असल्याचा दावा करत आहेत. 

या भागात ड्रॅनेजच्या पाइपलाइनचे काम सुरू होते. खोदकाम सुरू असताना अचानक एका मजुराला मोठा दगड लागला, हे नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्याने हाताने माती बाजूला केली. तेव्हा दगडाचा रेखीव मुखवटा समोर आला. दगडावर सुरेख रेखीव काम असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतो. या ठिकाणी स्थानिकांनी मंदिर बांधण्याची मागणी केली आहे. 

काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक कुटुंब राहत होते. मात्र, सुविधांअभावी त्यांनी ती जागा सोडली होती. त्यानंतर कित्येक वर्षांनंतर पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. आता याच ठिकाणी देवीचा मुखावटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातून काल रात्रीपासून लोकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. त्यामुळं काही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.