Bacchu Kadu Exclusive Interview : "महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार" असा इशारा अमरावती मतदार संघात भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला. "पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका", असेही बच्चू कडू 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत म्हणाले.
'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत बच्चू कडूंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांना तुम्ही पोलिसांच्या पाया पडताय, असा एक व्हिडीओ आला होता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, "आता लोकशाही आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो, पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असतील. आमच्याकडे परवानगी होती, सर्व काही होतं. उद्या सभा आहे आणि आज आम्हाला परवानगी नाकारतात हा अतिरेक आहे. असा प्रकार मुघल काळातही फार कमी होत होता."
"राजकारण्यांनी काही गोष्टी जपल्या पाहिजेत. त्याचेच परिणाम त्यांना भोगावे लागतील. पैसा आहे, सत्ता आहे म्हणून इतका अतिरेक करु नये. तुम्ही कोणाच्या घरात घुसणार का? आमच्याकडे त्या मैदानाची परवानगी होती. आमच्यासाठी काही क्षण का होईना ते घर झालं होतं. आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे. हा असा प्रकार कोण सहन करेल?" असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
"महायुतीला देशभरात सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागतील. ईडीमध्ये एकाच पक्षाची माणसं का दिसतात. भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का?" असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.