MLA Disqualification: आमदार अपात्रप्रकरणी 31 डिसेंबरपूर्वी सुनावणी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिलेयत. विधानसभा अध्यक्षांतर्फे तुषार मेहतांनी सुनावणीचं नवीन वेळापत्रक देण्यातं आलं. मात्र, कोर्टाने या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केलीय. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवाळी सुट्ट्या, हिवाळी अधिवेशनादरम्यान सुनावणी घेणे शक्य नाही त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेण्याची विनंती तुषार मेहतांनी केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा खडेबोल सुनावले. जर या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेऊ शकत नसतील, तर आता आम्हालाच सुनावणी घेण्याची वेळ आलीय असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
यावर सुप्रिया सुळेंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक असल्याचे त्या म्हणाल्या.
तुम्ही प्रक्रिया पूर्ण करत नसाल तर आम्हाला दखल घ्यावी लागेल, असे कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितले. यावर आम्हाला न्याय नक्की मिळेल. सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांची मुलगी त्यांच्यासोबत कोर्टात दिसली. यानंतर सकाळपासून वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. नवी पिढी राजकारणात येत असल्याचे तर्क लढवले जात होते. यावरदेखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. आज योगायोगाने माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला आईसोबत वाढदिवस साजरा करायचा होता. मुली पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मला अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.