शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला? नेमकं कारण काय?

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलेले असताना आता शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 13, 2024, 11:32 AM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला? नेमकं कारण काय? title=
MLAs scramble for ministerial berths shivsena Two And A Half Year Formula will decided

Maharashtra Cabinet Expansion: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सत्तास्थापनेनंतर महायुतीसमोर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा कायम आहे. सूत्रांनुसार, शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात येणार असल्याचे समोर येतेय. सर्वाधिक आमदारांना संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जातंय. 

राज्य मंत्री मंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडिच वर्षाचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडिच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पूढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्री पदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडिच-अडिच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्री पदाची संधी मिळणार असून मंत्री मंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणारा फॅार्मुला असणार आहे. 

म्हणजेच, शिवसेनेला 10 मंत्रीपदे मिळत असतील तर या पाच वर्षांत 20 आमदारांना मंत्रीपदे मिळणार आहेत. सूत्रांनुसार, पहिल्या अडिच वर्षात मागील मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू मिळू शकतो. तर, काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात. त्यात संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, खोतकर आणि शिवतरे, यांच्या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून बाकीचे जुन्या मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे. 

मागील मंत्रिमंडळातील ज्या नेत्यांचे प्रगतीपुस्तक खराब आहे. अशा नेत्यांना डच्चु देण्यात येणार आहे. सरकारच्या प्रगतीपुस्तकात 2-3 मंत्री नापास झाले आहेत. अडीच वर्षात महायुतीला कोंडित टाकणाऱ्या मंत्रीना डच्चू देण्यात आला असून त्या ऐवजी नवीन मंत्र्यांना सधी देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येतेय. 

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे समजतंय. भाजपला 20 मंत्रीपदं, शिवसेनेला 12 आणि अजित पवारांना 10 मंत्रिपदे दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत खातेवाटप फॅार्म्युला ठरला आहे. तीनही पक्षातील खाते वाटप बाबत चर्चा अंतीम टप्प्यात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांची यादी त्यांचा पक्ष फायनल करणार आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे डाग असलेल्या मंत्र्यामुळे महायुती ची प्रतिमा होता कामा नये याची काळजी घ्यावी असा भाजपकडनं सल्ला दिल्याचे बोलले जातेय.