पुण्यात मनसेचा राडा, माजी नगरसेवकासह ५ जणांना अटक

Updated: Jun 29, 2018, 06:59 PM IST

पाच रुपयांचे पॉपकॉर्न अडीचशेला विकणाऱ्या मल्टीप्लेक्सला मनसेचा दणका

पुणे : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही? ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का,असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय. जर बाहेरचे खाद्यपदार्थ सुरक्षेच्या कारणाखाली ग्राहकांना आणता येत नसतील तर या पदार्थ्यांच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नको का, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. आज शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलत राडा केला. मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरावरुन मनसेकडून पीव्हीआरमध्ये मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आलेय.

२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरावरुन पीव्हीआरमध्ये राडा घातल्या प्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शिंदे यांच्यासहित पाच कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आंदोलन करताना मनसैनिकांकडून थिएटर व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली होती. तसंच यावेळी पाच रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना कसे ? १० रुपयांचा वडापाव १०० रुपयांना कसा ? असे फलक लावण्यात आले होते.

दरम्यान, मनसेच्यावतीने कडक इशारा देण्यात आलाय. मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचे दर दोन दिवसांत कमी करा, अन्यथा खळ्ळ् खटय़ाक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे पुण्यातील मल्टिप्लेक्सना देण्यात आला आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाच्या दरांवर नियंत्रण का नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महिन्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पुण्यातील मल्टिप्लेक्सना खाद्य पदार्थाचे दर कमी करण्यास सांगितले आहे. मात्र, ज्यांनी ऐकले नाही, त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देण्यात आलेय.
 
माजी नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे, चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, संघटक सागर पाठक, आनंद कुंदूर, चेतन धोत्रे, नरेंद्र तांबोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन चित्रपटात घोषणा देत आंदोलन केले.