FASTag Wrong Deductions In Chandrpur: टोल वसुलीसाठी हल्ली फास्टॅगचा पर्याय वापरला जातो. मात्र, अनेकदा फास्टॅग यंत्रणेत त्रुटी असल्याचे समोर आले आहे. चंद्रपुरातही असाच एक प्रकार समोर आला आहे. यात गाडी दारातच उभी पण तरीही फास्टॅगमधून टोल कापला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
गाडी दारातच उभी आणि टोल क्रॉस केला म्हणून फास्ट टॅग मधून पैसे कापल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील व्यवसायी आणि पत्रकार जितेंद्र चोरडिया यांच्या बाबतीत घडला आहे. चोरडिया हे चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या इनोव्हा गाडी क्रमांक MH 34 AM 4410 साठी मालेगाव टोल नाक्यावरून फास्ट टॅगमधून ६२५ रुपये टोल कापण्यात आला आहे. टोल कापल्याचा मेसेज येताच जितेंद्र यांचा आधी गोंधळच उडाला. हा नेमका प्रकार काय आहे. हे कळायलाच मार्ग नव्हता.
जितेंद्र यांच्या मोबाईलवर टोलचे पैसे कापण्यात आल्याचा मेसेज पाहताच त्यांचा गोंधळ उडाला. सुरुवातीला त्यांना गाडी चोरीला गेल्याची शंका आली. त्यामुळं त्यांनी धावतच जाऊन गाडी कुठे आहे हे तपासले. तर विशेष म्हणजे गाडी दारातच उभी होती. कारमध्ये जाऊन बघितले तर फास्टटॅगचे स्टीकरही आत होते. त्यामुळं कोणी स्टीकर चोरले असल्याची शक्यताही नाहीशी झाली. जितेंद्र हे या आधीही कधीही मालेगावला गेलेले नव्हते. त्यामुळे फास्टॅगमधून पैसे कसे कापले गेले? हे कोड कायम आहे. प्रकरणाची ते आता ऑनलाइन तक्रार नोंदवणार आहेत.
FASTag ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे चालविली जाते. FASTag रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाप्रमाणेच कार्य करते. वाहनाच्या विंडशील्डवर फास्टॅग चिटकवलेला असतो. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीसाठी फास्टॅग बंधनकारक केले गेले आहे. फास्टॅगविना कोणतेही नवीन वाहन विकले जाणार नाही असे विक्रेत्यांवर बंधन आहे आणि महामार्गांवर जर असे फास्टॅगविना कोणतेही वाहन आढळल्यास देय टोलच्या दुप्पट रक्कम चालकाकडून वसूल केली जाते. वेगवेगळ्या सरकारी, खासगी तसेच सहकार क्षेत्रातील २२ प्रमाणित बँकांद्वारे आणि राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर आणि विविध निवडक शाखांमध्ये फास्टॅग जारी केले जातात.