VIDEO: आकाशात भगव्या रंगाची उधळण; इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर सूर्योदय होताना...

Pratapgad Sunrise Video: दोन दिवसांआधी प्रतापगड किल्यावर शिवप्रतापदिन साजरा झाला होता. शिवप्रताप दिनानंतरच्या सकाळी प्रतापगडाचं विहंगम दृष्य पाहायला‌ मिळालं. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 21, 2023, 04:57 PM IST
VIDEO: आकाशात भगव्या रंगाची उधळण; इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर सूर्योदय होताना... title=
Pratapgad Fort near Mahabaleswar mesmerising sunrise video tour guide

Pratapgad Sunrise Video: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..  महाराष्ट्राचे अगदी तंतोतत वर्णन केलेली गोविंदाग्रजांची ही कविता प्रत्यक्षातही खरी उतरत असते. महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. राज्यातील तलाव, समुद्र, जंगल समृद्ध आहेत. पण महाराष्ट्राची आणखी एक ओळख तो म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा सह्याद्री. कणखरपणे उभा असलेला सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराजाची साक्ष देत असतो. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत. रायगड, राजगड, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, रायगड, प्रतापगड यासारख्या अनेक किल्ल्यामुळं इतिहास ज्वलंत राहणार आहे. शिवरायांच्या किल्ल्याना भेट देण्यासाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील नागरिकही मोठ्या संख्येने भेट देतात. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड या किल्ल्याचा एक सुंदर व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. (Pratapgad Tour guide)

सातारा -प्रतापगड किल्याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. अगदी दोनच दिवसांआधी याच किल्यावर शिवप्रतापदिन साजरा सुद्धा झाला होता. शिवप्रताप दिनानंतरच्या सकाळी प्रतापगडाचं विहंगम दृष्य पाहायला‌ मिळालं. अनेक पर्याटकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हे विलोभनीय दृश्य कैद केले आहे. डोळ्यांचे पारणे फिटणारे हे दृष्य अगदी मनातच भरुन जातेय. तांबड फुडत असताना प्रतापगडाचा बुरुज इतिहासाची साक्ष देत मोठा रुबाबदार दिसत होता हे दृष्य पाहुन कॅमेरात टिपुन घेण्याचा मोह अनेकांना आवरला‌ नाही. 

हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही मोसमात मोठ्या प्रतापगडावर ट्रेकिंगसाठी पर्यटक गर्दी करतात. प्रतापगडावरुन दिसणारा सूर्योदय पाहण्यासाठी भल्या पहाटेच पर्यटक गड चढून येतात. प्रतापगडाचा बुरुज आणि त्यामागून होणारा सूर्योदय हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक कधीकधी रात्रीच गड चढण्यास सुरुवात करतात. बुरुजाभोवती पसरलेल्या भगवा रंग आणि आकाळात पसरलेल्या विविध रंगाच्या छटा हे दृष्य खूपच मनमोहक आहे. 

प्रतापगडावर कसं जाल?

प्रतापगड सातारा जिल्ह्यात असून तुम्हाला गडावर जाण्यासाठी सगळ्यात जवळचे ठिकाण महाबळेश्वर हे आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली, की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात.