दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एसपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण करून शासकीय नोकरी लावून देण्यासाठी राज्यात मोठं रॅकेट कार्यरत आहे. मात्र या रॅकेटचा पूर्ण पर्दाफाश करण्यात पोलीसांना अपयश आलंय.
2009 पासून सुरू असलेलं हे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी नांदेडमधील युवक योगेश जाधव याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच या रॅकेटने मुंबईत विक्रीकर निरीक्षकाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याचा केलेला प्रयत्नही योगेशच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून यात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. पाहूयात विशेष रिपोर्ट...
शासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी राज्यातील लाखो तरुण राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा देत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करून मेहनत करतात. मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम राज्यात कार्यरत असलेलं एक भरती रॅकेट करत आहे. या रॅकेटनं 2009 पासून अनेक जणांसाठी एमपीएससीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करून दिली आहे. तसंच असे अनेक जण आज शासकीय सेवेत मोठ्या अधिकारीपदावर मोठ्या ऐटीत कामही करत आहेत. राज्यातील या भरती घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा विडा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील योगेश जाधव या तरुणाने उचलला आहे. योगेशच्या पाठपुराव्यामुळेच मुंबईतील एमपीएससीच्या परीक्षेतील भरती रॅकेटचा असाच एक प्रयत्न फसला आहे. मुंबईत 31 डिसेंबर रोजी एमपीएससीतर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दोन जणांसाठी डमी उमेदवार बसवण्यात आले होते. योगेशने याबाबत पोलीसांकडे तक्रार केल्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलीय.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये परीक्षेत आपल्या जागेवर डमी उमेदवार बसवणा-या नांदेडच्या संतोष हंपलवाड आणि विलास मोतेवाड या दोन जणांसाठी डमी बसलेल्या शासकीय सेवेतील विक्रीकर निरीक्षक संदीप भुसारी आणि सचिन नराळे याप्रकरणी मध्यस्थी करणारा लातूर येथील तलाठी नरसिंह बिराजदार यांना आतापर्यंत अटक झाली आहे. तर MPSC भरती रॅकेटमधील सूत्रधार नांदेड येथील ग्रामसेवक अनंत कोलेवाड याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट बजावले आहे. कोलेवाड २०१७ साली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाला असून डमी उमेदवार बसवूनच तो ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पोलीसांना संशय आहे.
2009 पासून राज्यात शासकीय सेवेतील हे भरती रॅकेट कार्यरत असून यातील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप पोलीसांच्या जाळ्यात आलेला नाही. या सगळ्या रॅकेटचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिक्षक शंकर केंगार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचीही स्थापन करण्यात आली आहे.
MPSC परीक्षा रॅकेट प्रकरणी अटक झालेल्या पाच जणांपैकी तीन जण हे शासकीय सेवेतील अधिकारी आहेत. या सगळ्यांचा राज्यभरात २००९ पासून सुरू असलेल्या भरती रॅकेटशी संबंध असल्याचा संशय आहे. याचा योग्य दिशेने तपास झाला तर शासकीय सेवेत अशा पद्धतीने भरती झालेल्या अनेकांचा भांडाफोड होऊ शकतो.