एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात

MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 4, 2024, 04:31 PM IST
एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात  title=
एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात

MSRTC Driver Recruitment राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 7 तारखेपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरु केली. पण एसटीच्या संपामुळे त्यांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागलीय. अनेकांनी एसटीचे रिझर्व्हेशन केले आहे पण एसटी बंद असल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी एसटी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकेडे एसटी महामंडळात भरती जाहीर करण्यात आली आहे.  

एसटी महामंडळात चालक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असताना एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं आता एसटीची कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यासाठी जाहीरात निघाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. 

काय म्हटलंय जाहिरातीत?

एसटी महामंडळात चालक पदाची भरती केली जात आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालकाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच त्याला अवजड वाहन किंवा प्रवासी वाहतूकीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. तसेच त्याच्याकडे पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थाना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबधीतांनी आपले अर्ज महाव्यवस्थापक (वाहतूक) महामंडळ, रा.प. मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठवायचे आहेत. यासाठी 02223023900 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

महामंडळाला बसला आर्थिक फटका 

आंदोलनाचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला बसला आहे.आंदोनाच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे एसटीचा चक्काजाम झाला. अचानक कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने लालपरीला ब्रेक लागला. एसटी कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसला. केवळ प्रवाशीच नाही तर या एका दिवसाच्या संपाचा परिणाम फार मोठा आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 50 टक्के वाहतूक बंद होती. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एसटी बसच्या एकूण 11 हजार 943 फेऱ्या रद्द झाल्या.251 एसटी बस आगारांपैकी 59 बस आगारे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे बंद होती.  तर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 77 आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरु होती.  एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी 14 ते 15 कोटींचा फटका महामंडळाला बसला.राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रामाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.