BMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 7, 2024, 11:38 AM IST
BMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...  title=
Mumbai Anti-Corruption Bureau Books Two BMC engineers In Bribery Case

Mumbai Crime News: पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी 20 लाखांची लाच मागणार्या पालिकेच्या दोन अभियंत्यासह तिघांना मुंबई विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने अटक केली आहे. मंगेश कांबळी, सूरज पवार, निलेश होडार अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी मंगेश कांबळी हा मरीन लाइन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर, तिसरा आरोपी सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करतो. तक्रारदाराच्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्काषन कारवाईची नोटिस बजावण्यात आली होती. नोटिस आल्यानंतर फिर्यादी हे कांबळी आणि पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. 

तक्रारदावार कारवाईची न करण्यासाठी त्यांच्याकडे लाच म्हणून 20 लाख रुपये मागितले. टेरेसवरील शेडसाठी 15 लाख तर उर्वरित 5 लाख हे पाचव्या मजल्याच्या अनधिकृत कामावर कारवाई न करण्यासाठी मागत होते. तक्रारदाराने सुरुवातीला त्यांना 20 लाख रुपये देण्याचे मंजुर केले. 

आरोपींची भेट घेऊन झाल्यानंतर तक्रारदारांनी या पालिकेच्या दोघांविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे 4 एप्रिल रोजी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करुन आरोपींनी रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात तिघेही आरोपी रंगेहाथ अकडले आहेत. 

5 एप्रिल रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कांबळी पवार तसेच त्यांच्या वतीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून 8 लाख रुपये स्कीकारणाऱ्या होडार याला अटक केली आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत. 

सिन्नरमध्ये चोरी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

नाशिकच्या सिन्नर तालूक्यातील पाथरे गावात भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून लाखोचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या नाशिक ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळाल्या आहेत. टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जेरबंद करण्यात आलेले सर्व आरोपी येवला तालूक्यातील रहिवासी आहे. चार दिवसापुर्वी या टोळीने वावी पोलिस स्टेशन हद्दीतील पाथरेच्या मयुरेश काळे यांच्या बंद घरात भरदिवसा दरोडा टाकत १४ लाखाची रोख रक्कम व दागिने चोरुन नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून दोन चारचाकी गाड्यासह एकुण २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.