Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव म्हटलं की, कोकणकरांचा उत्साह आभाळाला गवसणी घालतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर असणारे कोकणवासीय शक्य त्या सर्व परिंनी या सणाच्या निमित्तानं आपल्या गावची वाट धरण्याच्या प्रयत्नांत असतात. एसटीचं रिझर्व्हेशन, रेल्वे तिकीट, चाळण झालेले रस्ते अशा एक ना अनेक संकटांवर मात करून ही मंडळी अगदी सहकुटुंब गावाकडे निघतात. अशा या प्रत्येक कोकणकरासाठी ही महत्त्वाची माहिती.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाआधी कोकणात काही मत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हं असून, याच बदलांसाठी कोकणातील विकासाचे प्रश्न केंद्रापर्यंत मांडणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी ही भेट झाली असून यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची बाब नारायण राणे यांच्या X वरील पोस्टमध्ये पाहायला मिळाली.
राणेंनी या भेटीदरम्यानचं एक छायाचित्र शेअर करत त्यावरील कॅप्शनमध्ये लिहिलं, 'केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज भेट घेतली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई, गोवा महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी निवेदन देऊन केली'.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय @nitin_gadkari जी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी निवेदन देऊन केली. pic.twitter.com/SZfptgumpT
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 27, 2024
राज्यात आणि देशात अनेक प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास गेले असले तरीही मुंबई- गोवा महामार्गाचं काम मात्र अद्याप प्रलंबित असून, दरवर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात जातात. या प्रवासामध्ये त्यांच्यापुढं सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे खड्डेमय आणि अपूर्ण रस्त्यांचं. कोकणातील अशाच काही प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात राणेंनी गडकरींसमोर आपली भूमिका मांडत काही मागण्या उचलून धरल्या. तेव्हा आता केंद्रीय मंत्रीमहोदयांची कोकणावर कृपा झाल्यास खऱ्या अर्थानं कोकणकरांना गणपती पावला असं म्हणायला हरकत नाही.