Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. एखादी लोकल चुकली किंवा वेळेत आली नाही तरी ऑफिस गाठायला उशीर होतो. थोडक्यात काय तर मुंबईकरांचे संपूर्ण गणित हे लोकलवर अवलंबून असते. गेल्या काहि दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकाबाबत एक वृत्त समोर आले होते. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता याबाबत दिलासादायक माहिती समोर येत आहे. बदलापूर येथील फलाट क्रमांक 1 पूर्णपणे बंद करण्यात येत नसल्याचे रेल्वेने म्हटलं आहे.
बदलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पूर्णपणे बंद झाल्यास प्रावाशांची गैरसोय होईल, असा मुद्द समोर आल्यानंतर त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित कामाची चाचपणी केली. त्यानंतर होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक 1मध्ये संपूर्ण बॅरिकेटिंग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचे काम सुरू असलेल्या 20 मीटर जागेवर बॅरिकेटिंग लावण्यात येणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळंच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीये.
शनिवारी मंत्री कपिल पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यावेळी मध्य रेल्वे व एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. कपिल पाटील यांनी म्हटलं आहे की, बदलापूर रेल्वे स्थानकात 6 एक्सलेटर, 3 लिफ्टचे काम सुरू होणार आहे. त्याचसोबत होम प्लॅटफॉर्मबरोबरच 12 मीटर रुंदीचे दोन पादचारी पूलाचे काम सुरू आहे. काही काळ प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १ पूर्णपणे बंद केला जाणार नसून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही. रेल्वे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी केवळ २० मीटरपर्यंत बॅरेकेटींग केले जाईल. रेल्वे स्टेशनवरील कामांसाठी प्रवाशी व रेल्वे प्रशासन यांच्यात सुवर्णमध्य काढला जाईल.
शनिवार, दिनांक ३… pic.twitter.com/pe8EeXEoyU
— Kapil Patil (@KapilPatil_) February 3, 2024
दरम्यान, काही काळापुरता 1 नंबर प्लॅटफॉर्म बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कळतेय. तशी माहितीही प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली आहे. स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसंच, तीन प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी 3 एक्सलेटर तसंच, एक लिफ्टचे काम सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकात 12 मीटर रुंदीचे दोन स्वतंत्र पादचारी पूलदेखील उभारण्यात येणार आहेत. काहि दिवसांत या कामाला सुरुवात होणार असून मेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान उद्घाटन केले जाईल, अशी माहिती मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. तसंच, रेल्वे स्थानकातील इतर कामांबाबत प्रशासनाकडून पुढील 15 दिवसांत आढावा घेऊन चाचपणी केली जाईल. मगच पुढे निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास पाटील यांनी वर्तवला आहे.