Mira Road Live In Partner Murder Case: मीरा रोड येथे एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोज साने असं या नराधमाचे नाव असून त्याने मयत तरुणीचे नाव सरस्वती वैद असं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही सात वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याप्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बुधवारी रात्री शेजाऱ्यांमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. मनोजच्या घरातून दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती. सुरुवातीला शेजाऱ्यांना घरात उंदीर मेला असेल असा समज झाला. मात्र, दुर्गंधी वाढत गेल्याने त्यांना संशय आला. म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मनोजच्या घराचा दरवाजा उघडताच दुर्गंधीचा भपकारा आला. आत पोलिसांना सरस्वतीचा मृतदेह सापडला. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
चार दिवसांपूर्वीच मनोजने सरस्वतीची हत्या केली होती. पोलीस सूत्रांनुसार, सरस्वती अनाथ होती. तिचे या जगात कोणीच नव्हते. आरोपी मनोज साने आणि तिची ओळख २०१४ साली झाली होती. मनोज साने याच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मनोज साने बोरीवलीत रेशनिंगच्या दुकानात काम करत होता. इथेच त्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर काही ना काही निमित्त्याने त्यांची ओळख वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्षांनंतर मनोज आणि सरस्वतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मनोज आणि सरस्वती गेल्या सात वर्षांपासून एकत्र राहत आहेत.
महिलेच्या हत्येनंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले होते. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून ते कुत्र्यांना खायला घातले. त्यानंतर टॉयलेटमध्येही मृतदेहाचे तुकडे फ्लश करत होता.
मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे शंभर तुकडे केले असल्याचा दावा शेजारी राहणाऱ्यांनी केला आहे. मनोजच्या घरातून खूप दुर्गंधी येत होती. आम्हाला आधी वाटलं की एखादा उंदीर मेला आहे का? म्हणून आम्ही संपूर्ण मजल्याची स्वच्छता केली. मात्र, तरीही दुर्गंधी कमी झाली नाही. उलट दिवसेंदिवस दुर्गंधी वाढतच होती. म्हणून आम्ही पोलिसांनी याबाबत माहिती दिली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.
पोलिस आल्यानंतर दरवाजा उघडताच आम्हाला हॉलमध्ये लादी कापण्याचा एक कटर दिसला. तर आत बेडरुममध्ये पॉलीथीन अंथरले होते आणि त्यावर मोठा करवत होता. किचनमध्ये गेल्यावर दोन बादल्या आणि एक पातेले होते. या दोन्ही बादल्यांमध्ये काळं काळं रक्त होतं. मासं आणि हाडांनी बादल्या भरल्या होत्या, अशी अंगावर काटा आणणारी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.