Mumbai News Today: मुंबईकरांचे पाणी महागण्याची चिन्ह आहेत. मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जल अभियंता विभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय होणार आहे. तर पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास आणि दरवाढ लागू झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईकरांना दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेने 2012 मध्ये पाणीपट्टीत दरवर्षी कमाल 8 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. स्थायी समितीनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्याआधारे पालिकेकडून दरवर्षी 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ केली जाते. जल अभियंता विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आपला प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला मिळाला असून येत्या २५ नोव्हेंबर रोजी त्यावर निर्णय घेऊ अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे.
अस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी तसेच धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च अशी विविध कामे पालिकेकडून केली जातात. या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांकडून पाणीपट्टी आकारली जाते. गेल्यावर्षी पालिकेने पाणीपट्टीत 7.21 टक्के वाढ केली होती. तर, यंदा 8 टक्के पाणीपट्टी दरवाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला आहे.
यावर्षी जून महिन्यात लेखा विभागाने पाणीपुरवठ्याच्या खर्चाचा आढावा घेण्यास सुरूवात केली होती. तेव्हाच राजकीय पक्षांनी पाणीपट्टीच्या दरवाढीला विरोध केला होता. तसंच, करोनामुळे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या मागील दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर व अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुंबईकरांना पाणीपट्टीचे जादा पैसे मोजावे लागणार आहेत.