Mumbai AutoRickshaw Fare: मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने रिक्षाचे भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, आता मुदत उलटून गेल्यानंतरही सरकारने निर्णय न दिल्याने आता युनिअन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील रिक्षा चालक कोर्टाचे दार ठोठावणार असल्याची माहिती समोर येतेय.
सध्या मुंबईत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरसाठी 23 रुपये आहे. मात्र, हे भाडे 23 रुपयांवरुन 25 रुपये करावे, अशी मागणी युनियनची आहे. खटुआ समितीच्या फॉर्म्युल्यानुसार ग्राहक मूल्य निर्देशांक, रिक्षा विकत घेण्याचा खर्च, रिक्षांची डागडुजी करण्याचा खर्च, विमा आणि विविध कर लक्षात घेऊन रिक्षाचे भाडे ठरवण्यात येते. त्यामुळं रिक्षा युनिअनने रिक्षाचे भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर सरकारकडून अद्याप काही प्रतिसाद देण्यात आला नव्हता.
ऑक्टोबर 2022मध्ये रिक्षाचे भाडे 21 रुपयांवरुन 23 रुपये करण्यात आले होते. मात्र, आता ते 23 रुपयांवरुन 25 रुपये करण्याची मागणी होत आहे. युनिअनच्या अध्यक्ष थंपी कुरियन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. युनिअनने एमएमआरटीएकडे ही मागणी केली आहे. मात्र, त्यावर सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने रिक्षा चालकांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नवीन आरटीओ दंड, रिक्षा स्टँडची कमतरता, अपूर्ण राहिलेली आश्वासने यासगळ्या मागण्या युनिअन कोर्टात घेऊन जाणार आहे. व कोर्टात दाद मागणार आहे.
दरम्यान, 1 ऑक्टोबर 2022मध्ये सरकारने रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रिक्षा टॅक्सी युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सरकारच्या मंजुरीनंतर मुंबईत टॅक्सीचे भाडे 3 रुपयांनी तर ऑटोरिक्षाचे भाडं 2 रुपयांनी वाढवण्यास सरकारने मंजुरी दिली होती. या नवीन भाडेवाढीमुळं काळ्या-पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करण्यासाठी किमान 28 रुपये आणि ऑटोरिक्षाने प्रवास करण्यासाठी 23 रुपये मोजावे लागतात.
दोन वर्षापूर्वीच भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा रिक्षा युनियन भाडे वाढ करण्याची मागणी करत असताना मुंबईकरांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडणार आहे. आधीच सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत असताना प्रवासही महागणार आहे.