नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश 

Updated: May 22, 2020, 08:34 AM IST
नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार

नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार Dसल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबतचे आदेश आजपासून अंमलात येईल. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेडझोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये  पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त स्टॅन्डअलोन स्वरूपातील दुकाने सुरू राहतील, असेही आदेशात नमूद करणयात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आलं होतं. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला  रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शहरात खाजगी कार्यालये बंद राहणार  असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय/निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ 5 टक्के कर्मचारी क्षमतेसहच  तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.    

सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ‘नाईट कर्फ्यू’

नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे या आदेशाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई सुद्धा पोलिस विभागामार्फत होणार आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक  सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही.

MHA द्वारे निर्गमीत करण्यात आलेली मानक कार्यप्रणाली

-     सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
-     सार्वजिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास राज्य किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निर्धारित केलेल्या नियम आणि कायद्यानुसार दंड
-     सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये सर्व व्यक्तींनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य
-     लग्न समारंभामध्ये सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी
-     अंत्यविधी प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये
-     सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदी
-     दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुट अंतर राखणे तसेच एकावेळी 6 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही

कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त निर्देश

-     शक्य तेवढे ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राथमिकता देणे
-     कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम/व्यवसायासाठी ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करणे
-     सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या आणि बाहेर निघण्याच्या द्वारावर थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटाजरची व्यवस्था करणे
-     संपूर्ण कामाचे ठिकाण, वारंवार संपर्कात येणा-या वस्तू जसे दरवाज्याचे हँडल आदी वेळोवेळी शिफ्टनुसार निर्जंतुक करणे
-     कामाच्या ठिकाणी सर्व व्यक्ती, कामगारांमध्ये, त्यांच्या शिफ्टमध्ये आणि लंच ब्रेकमध्ये योग्य सुरक्षित अंतर असण्याची दक्षता संबंधित प्रमुख व्यक्तीने घ्यावी