अंडाकरीसाठी मित्राची हत्या, आता तुरुंगाची हवा खाणार

अंडाकरीसाठी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.  

Updated: Oct 19, 2020, 10:30 PM IST
अंडाकरीसाठी मित्राची हत्या, आता तुरुंगाची हवा खाणार

नागपूर : अंडाकरीसाठी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.  बनारसी असं मयत व्यक्तीचं आहे. गौरव उर्फ निक्की गायकवाड असं क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करणा-या आरोपीचं नाव आहे. मानकापूर पोलिसांनी गौरव उर्फ निक्की गायकवाड या आरोपीला अटक केली आहे. गोधनी पेट्रोल पंपजवळ शनिवारी मध्यरात्री  जखमी अवस्थेत एक व्यक्ती पडलेला असल्याची माहिती मानकापूर पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासात मृताचे नाव बनारसी असल्याचं समजलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजमध्ये  बनारसी आणि आरोपी गौरव गायकवाड दोघे सोबत जात असल्याचं दिसलं. 

दरम्यान गौरव भंडाऱ्याला पळून जाणाच्या बेतात असताना माहिती  पोलिसांना मिळाली.. त्यामुळं पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं .गौरव कुख्यात गुंड असून त्याच्यावर 2017-18मध्ये अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत तर  बनारसी हा मजूर होता.

तो आणि गौरव मित्र आहेत.शनिवारी बनारसी आणि गौरवनं दारू पिण्याचा आणि अंडाकरी खाण्याचा बेत आखला . गौरव दारू आणणार असल्याचे तर बनारसीने अंडाकरी बनविण्याचे ठरले.गौरव दारू घेऊन आला. त्यानंतर गौरव आणि बनारसी दोघेही रात्री साडेदहा अकरापर्यंत दारू पित बसले. त्यानंतर दोघांनाही भूक लागली. 

गौरवनं बनारसीला अंडाकरीबाबत  विचारणा केली असता, बनारसीने अंडाकरी बनविली नसल्याचे सांगितलं. त्यामुळं संतापाच्या भरात बनारसीला दांड्याने आणि दगडानं मारहाण करत हत्या केल्याचं गौरवनं कबूलं केलं.