जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर: शहरात बंद पडलेल्या मनपा शाळांच्या इमारतीत केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर महापालिकेने मांडलाय.
यावर केंद्रीय विद्यालय समितीने शहरात नवी केंद्रीय विद्यालयं सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिलीय. नागपुरात सध्या 4 केंद्रीय विद्यालयं आहेत. केंद्रीय विद्यालयं सुरू करण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेतली. नितीन गडकरींनीही यासाठी पाठपुरावा केलाय.
बंद पडलेल्या शाळांच्या इमारतीत एक तर दुसरी कार्यालयं आहेत. अनेक इमारती पडीक अवस्थेत आहेत. मात्र सर्व सोयीसुविधायुक्त इमारत आणि प्रशस्त पटांगण असलेल्या या इमारतींची केवळ डागडुजी केल्यास वापरात येऊ शकतात. केंद्रीय विद्यालयं सुरू झाल्यास महापालिकांच्या अन्य शाळांवर काहीही परिणाम होणार नाही असा मनपाचा दावा आहे. मात्र खरोखर तसा परिणाम होऊ न देण्याची जबाबदारी मनपाची आहे.