अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी असतात त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जातो. पण कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून अनेकवेळा नियम पाळले जात असल्याचंही समोर आलं आहे.
नागपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. नो पार्किंग मध्ये बाईक उभी असतांना वाहतूक पोलिसांनी थेट चालकासह टोईंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपस्थित एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये या घटनेचे चित्रीकरण केलं आहे.
नागपूरात नो पार्किंग मध्ये दुचाकी लावल्याने वाहतूक शाखेच्या हायड्रॉलिक क्रेनने चक्क दुचाकीस्वारासह उचललं. नागपूरमधल्या अंजुमन कॉम्प्लेक्स जावळील हा प्रकार आहे. एका व्यक्तीने नो पार्किंग मध्ये दुचाकी लावली होती. वाहतूक विभागाने नो पार्किंगमध्ये असलेली वाहन उचलण्याचं कंत्राट एका खाजगी कंपनीला दिलं आहे.
या कंपनीच्या माणसांकडून नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींवर कारवाई सुरु होती. त्याचवेळी एका दुचाकीचा मालक तिथे आला आणि दुचाकीवर बसला. आपण गाडी काढत असल्याचं त्यानं सांगितलं. पण कंपनीच्या माणसांनी त्याचं म्हणणं न ऐकता हायड्रोलिक वाहनाने चक्क वाहन चालकासह दुचाकी उचलली.
वाहन चालक चुकत असला तरी वाहतूक पोलिसांना अशा पद्धतीने कारवाई करणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.