मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमधून रद्द केलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. येथील ग्रामस्थांना विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जमीन संपादनाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प कोकणातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार असल्याचे वृत आले. तर दुसरीकडे शेकाप नेते जयंत पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन होऊ देणार नसल्याचा इशारा जयंत पाटलांनी दिला आहे.
रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही. स्थानिकांना तो नको असल्याने आम्ही त्याला विरोध केला आहे. राजापूर येथून तो हटवला आहे. महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल, अशी भूमिका शिवसेनेची असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याआधी दिली होती. हा प्रकल्प हलविण्याचा हालचाली सुरु झाल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला नेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ती केवळ चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकल्प राजापूर येथे व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील होते. त्यासाठी सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रकल्पाच्याबाजुने भूमिका घेतली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेशी जुळवून घ्यायचे होते. त्यामुळे शिवसेनेला नाराज करुन कोणतीही भूमिका भाजपला घ्यायची नव्हती. त्यामुळे भाजपने हा प्रकल्प राजापूर येथून हलविण्याचा निर्णय घेतला. आता हा प्रकल्प रत्नागिरीचा शेजारचा जिल्हा रायगड येथे हलविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्याचवेळी हा प्रकल्प रायगडमध्ये येणार असल्याचे कळताच शेकापने विरोध केला आहे. जयंत पाटील यांनी प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे रत्नागिरीत जसे राजकारण झाले तर रायगडमध्ये राजकारण होण्याचे संकेत मिळत आहे.