नांदेड : भाजपच्या घौडदौडीला अशोक चव्हाण यांनी लगाम लावलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपचा वारु परतवून लावलाय.
अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. मात्र, भाजपला त्यात यश मिळाले नाही. नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिलाय. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा वारु रोखणे भाजपला जड गेलेय. त्याचबरोबर राष्ट्रवादीलाही आपला इंगा चव्हाण यांनी दाखवून दिलाय. तसेच आयएमएमला पुन्हा डोके वर काढू दिलेले नाही. तर शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजप दे धक्का देणार असेच वातावरण तापवले गेले. मात्र, अशोक पर्वाला सगळेच राजकीय पक्ष थोपवू शकलेले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण सर्वांच भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष वेधल्या गेलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या ८१ जागांसाठी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारी नुसार काँग्रेसने ७३ जागांवर विजय मिळवलाय तर भाजपने ६ जागा पदरात पाडून घेतल्यात. त्यामुळे नांदेड महापालिकेवरील वर्चस्वासाठी काँग्रेसची बाजू भक्कम दिसून आली. तर भाजपमध्येच अस्तित्वासाठी लढाई सुरु असल्याचे दिसून आलेय.
दरम्यान, शहरातील विकासात्मक कामे काँग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच लोकांनी आम्हाला निवडून दिलेय. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिलेय. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मात्र, त्यांना नांदेडकरांनी मतदानातून उत्तर दिलेय, प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलेय.