नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब (Gurudwara Takht Shri Hazoor Sahib) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागील 50 वर्षांपासून गुरुद्वाराला मिळालेल्या सोन्याचा वापर वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी होणार आहे. या मिळालेल्या सोन्याचा वापर रुग्णालय बांधण्यासाठी तसेच सर्व लहान-मोठ्या आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
ही घोषणा जत्थेदार कुलवंत सिंह यांनी केली आहे. ते म्हणाले की, "नांदेडच्या लोकांना उपचार घेण्यासाठी हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरात जावे लागेल. नांदेडमध्ये एखादे चांगले रुग्णालय बांधले गेले तर लोकांसाठी हे फायद्याचे ठरेल."
या गुरुद्वारामधून लोकांना आधिपासूनच ऑक्सिजन सिलिंडर्स तसेच औषध आणि जेवणाची व्यवस्था केली जात आहे. गुरुद्वाराकडून केलेल्या या घोषणेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यात असे म्हटले आहे की, 'गुरुद्वारामध्ये जमा असलेले सोनं लोकं कल्याणासाठी वापरले जाईल.'
गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी बऱ्याच गुरुद्वारा प्रशासकीय समित्या अस्तित्त्वात आल्या आणि त्यांनी नि: शुल्क ऑक्सिजन देण्यासाठी सुरवात केली.
कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी, कोविड रूग्णांना संकटापासून वाचवण्यासाठी देशभरातील अनेक गुरुद्वारांच्या प्रशासकीय समित्यांनी अन्न, बेड्स आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली. एक दिवस आधी शिरोमणी गुरुद्वारा प्रशासन समितीने पंजाबच्या रूपनगरमधील गुरुद्वारा श्री भट्ट साहेबांच्या दालनात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्था समिती प्रमुख जगीर कौर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन 23मे रोजी पार पडले.दिल्ली गुरुद्वारा प्रशासन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, लॉकडाऊन आणि कोरोना संक्रमणाचे वाढते संकट लक्षात घेता गुरुद्वारा बंगला साहिब यांच्याकडून लंगर सेवा सुरू केली आहे.
या सेवेमध्ये कोरोना पीडित कुटुंबीय, जे स्वत: जेवण बनवण्याच्या स्थितीत नाहीत त्यांच्या घरी टिफिन पोहचवले जात आहे.
दिल्लीच्या गुरुद्वारा समितीनेही एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. ज्या कुटुंबांना घरात लंगर सेवा हवी आहे, त्यांनी दिलेल्या फोन नंबरद्वारे दिल्ली गुरुद्वारा समितीशी संपर्क साधू शकतात. ही समिती त्यांच्या घरी जेवण पोचवण्याची व्यवस्था करेल.