close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास

 सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

Updated: May 18, 2019, 03:24 PM IST
नंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास

प्रशांत परदेशी,झी मीडिया, नंदुरबार : राज्यात  नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाई ही इतरांच्या तुलनेत खूप वेगळी आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तब्बल आठ ते दहा किलोमीटर पर्यंतचे चढ-उतार आणि डोंगर पार करत या भागातल्या आदिवासींना पाणी आणावं लागतं. शासनाने केलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याने इथला पाणीबाणीचा संघर्ष हा प्रत्येक क्षणाला जीवघेणा असतो. सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या सदन समजल्या जाणाऱ्या तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर आदिवासी वस्त्या आहेत.  अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गाव पाड्यांवर जाण्यासाठी रस्ते नाहीत. पायाभूत सुविधांचाही इथे अभाव आहे  आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अति गंभीरच होत चालला आहे. सातपुड्याचा डोंगर रांगामध्ये केवलापणी आणि आंबापाणी ही गावे आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १२ पाडे असून या ग्रामपंचायतीचे क्षेत्र जवळपास ७ किलोमीटर परिसरात विस्तारित आहे. तर जवळपास १५०० ते २००० हजार लोकसंख्या आसलेल्या या गावामध्ये पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. 

Image result for draught nandurbar zee news

या भागातल्या आदिवासी बांधवांना आणि महिलांना आपल्या मुलांना कडेवर घेऊन पाणी भरावे लागत आहे. विशेष म्हणजे पाणी भरण्यासाठी डोंगरदऱ्या पार करत थेट पायथ्याशी यावं लागतं आणि तिथून पाणी वाहून नेत डोंगर चढावा लागतो. सातपुड्याचा डोंगर रांगा मध्ये पिण्याचा पाण्यासाठी फिरफिर  इतकी वाढली आहे, की इथे हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर ची पायपीट करावी लागते.  हाती मिळेल ते दुषित पाणी पिऊन गावकर्यांना तहान भागवावी लागत आहे आंबापाणी आणि केवलापाणी या गाव पाड्यासह या भागातील पाणी टंचाई आणीबाणी वाटू लागली आहे. 

आम्ही डोक्यावर हंडा घेऊन दिवस भर पाण्यासाठी वणवण भटकत आसतो आमचा पूर्ण दिवस पाणी भरण्यात जात आसतो मात्र सरकार या कडे लक्ष देत नाही अनेक वेळा मोठ्या साहेबाकडे गावातील लोकासोबत जौंत्क्रारी केल्या आहेत मात्र याकडे कुणी लक्ष देत नसल्याचे गावकरी सांगतात. या पाड्या-वस्त्यांवरचे हात पंप हे नामधारी झाले आहे. दृश्य स्वरूपात त्यांचं अस्तित्व आहे मात्र उपयोग त्यांचा शून्य आहे. अशा परिस्थितीत पाण्याची तहान भागवण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये ज्या ठिकाणी झरे अथवा नाले वाहत आहेत त्या ठिकाणी जाऊन या लोकांना पाणी वाहून आणावे लागते. टॅंकरने पाणी पुरवठ्याच तर या भागात कोणी नावे घेत नाही. पाण्याच्या या संघर्षाबाबत शिक्षित तरुणांनी संघर्ष कमी केला आहे? असंही नाही. नदी,नाल्यांचे, डबक्यातले पाणी प्यावे लागत असल्याने या मुलांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणी दाद देत नाही हे दुर्दैव.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची काहीशी सारखीच परिस्थिती आहे. या ठिकाणी अधिकारी आचारसंहितेचा बहाणा करून आणि फिल्डवर जाण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. कामचुकार आणि आपल्या तोऱ्यात वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये हंडाभर पाणी आणण्याची शिक्षा दिल्याशिवाय दुष्काळाचा सामना करणाऱ्या आणि पाण्यासाठी वणवण भटकणार्‍या यांची वेदना ही यंत्रणेच्या लक्षात येणार नाही.