Maharahstra Politics : पालकमंत्री पदांचे वाटप झाले असले तरी यावरुन पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर अजित पवार गटाला नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे देखील पालकमंत्रीपद पाहिजे. नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यात सध्या शिंदे गटाचे पालकमत्री आहेत. यामुळे महायुतीत पालमंत्री पदाचा तिढा वाढणार आहे.
काल परवा आजारी असलेले अजित पवार आज मंत्रालयात आले असले तरी महायुतीत अजूनही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. अजित पवार नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकमध्ये छगन भुजबळांना तर आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्री करा, अशी अजित पवारांची मागणी आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी दादा भुसेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. तर रायगडऐवजी रत्नागिरी पालकमंत्री घ्या असं शिंदेंचं म्हणणंय. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार याकडे लक्ष आहे.
एकीकडे अजितदादांची नाराजी दूर झाली असली तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रिपद बदलण्यात आलं. ती पदं अजित पवार गटाला देण्यात आली.. शिवाय अजित पवारांनाही आणखी काही पदं हवी असल्याची माहिती मिळतेय. यावरच अमित शाहांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर, नक्षलसंदर्भातल्या एका बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय.
चंद्रकांत पाटलांची पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात आलीय. 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलंय. पालकमंत्रिपदाचं वाटप होत नसल्यानं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पालकमंत्री तातडीनं जाहीर करण्यात आलेत.