किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सूटतं मात्र जर तुम्ही पाणीपुरी खात असाल तर सावधान असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय. नाशिकमध्ये या पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आलाय.
नाशिकच्या सातपूर परिसरातील बजरंग नगरच्या मळे परिसरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरु होता. यावेळी हे पथक मूळचे मध्यप्रदेशचे असलेले दिवान सिंग यांच्या पाणीपुरीच्या दुकानाजवळ पोहचले तेव्हा गलिच्छ प्रकार समोर आला. सडलेले बटाटे, कलरमिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरभरे, उघड्यावर पडलेल्या पुऱ्या आणि पाणीपुरीसाठी लागणारं सर्व साहित्य इथल्या जागेवर ठेवण्यात आलं होतं.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व साहित्य जमा केले आणि अस्वच्छता, प्लास्टिकचा वापर तसेच पाणीपुरीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या प्रकरणी दिवानसिंगला ५ हजार रुपयांचा दंड ही ठोठावला.
जे झालंय ती चूक झालीय मात्र त्याच्यात बटाटे थोडेच खराब होते. याच्यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असे पाणीपुरी विक्रेता दिवान सिंगने म्हटलंय
पाणीपुरी हा तर अनेकांचा वीक पाँईंट...पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सूटतं मात्र पाणीपुरीच्या नावाखाली जर अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर ही नक्कीच गंभीर बाब असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय.
पाणीपुरी बाहेर खाणे शक्यतो टाळायला पाहिजे. आता घरी पाणीपूरी देखील बनवता येते त्यामुळे लोकांनी शक्यतो घरी पाणीपुरी बनवून खावे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आरोग्य पाणी किंवा चांगलं पाणी मिळतं त्या ठिकाणी पाणीपुरी खायला पाहिजे. नाशिक महानगरपालिकेचे प्रशासनाची कारवाई केली ती नक्कीच चांगली आहे. मात्र ही कारवाई औषध प्रशासनानं करायला हवी होती. आणि जनतेच्या जीवाशी खेळ होतोय तो थांबायला पाहिजे त्या दृष्टीनं औषध प्रशासनाने ही कारवाई सुरू करायला पाहिजे असे नाशिक महानगरपालिका आरोग्य सभापती दीपाली कुलकर्णी म्हणाल्या.
अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न औषध विभाग कार्यरत असतो मात्र तो फक्त नावालाच असल्याचं बघायला मिळातंय.. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळ सुरु असताना अन्न औषध प्रशासन झोपा काढतंय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.